अजि म्या "प्रभू" पाहिले
निर्माता - दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या 'शिवराज अष्टक ' या संकल्पनेतील पावनखिंड हे तिसरे सोनेरी पान. पु. लं.च्या भाषेत सांगायचं झालं तर केवळ हरितात्यांच्या " काकदृष्टी "सच दिसलेला आणि त्यांच्या तोंडून लक्ष वेळा ऐकलेला हा पावनखिंडीतला रणसंग्राम आज आपण पाहणार, म्हणून सिनेमा पाहताना एक वेगळाच हुरूप आला होता. पन्हाळगडाला आदिलशाही मातब्बर सरदार सिद्दी जौहर ने वेढा दिला आणि महाराजांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. त्याला शह देण्यासाठी महाराज कोंडी फोडून पन्हाळ्याहून निसटतात आणि अक्षरशः हजारो अडथळ्यांची शर्यत पूर्ण करत विशाळगडावर पोचतात. पण यादरम्यान रात्रभर अनवाणी सह्याद्रीच्या कडेकपारीतून धो धो कोसळणाऱ्या पावसात धावून थकलेल्या परंतु शिव-ऊर्जेने भारलेल्या 300 धारकरी मावळ्यांनी 10000 च्या प्रचंड आदिलशाही फौजेला एक दोन नव्हे तर तब्बल नऊ तास घोडखिंडीतच असं रोखून धरलं की त्यांना इंचभर ही पुढे जाता आलं नाही... ही इतिहासातील अजरामर, प्रेरणादायी कथा इथे मांडली आहे. या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे याची तगडी स्टारकास्ट.... चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, अंकित मोहन, हरीश दुधाडे, समीर धर्माधिकारी, आस्ताद काळे आणि बाजीप्रभूंच्या भूमिकेत अजय पुरकर या सर्वांनी कथेतील पात्रांना नुसता न्याय दिलेला नाही, तर ही पात्र जीवंत उभी केलेली आहेत.
कथेशी प्रामाणिक राहून केलेला हा एक उत्तम चित्रपट आहे. इथे आपले बाजीप्रभू अथवा प्रमुख पात्र उगाचच पिंगा घालत, नाचत शिवचरित्र चे " प्रदर्शन" मांडत नाहीत, तर खऱ्याखुऱ्या, तेजोमय शिवकथेचे " दर्शन" घडवतात. शिवा काशिदच्या बलिदानाचा प्रसंग मन हेलावून सोडतो. चटकन लक्षात आलं की या 18-20 वर्षांच्या कोवळ्या पोरांनी स्वराज्यासाठी हसत हसत आयुष्य अर्पण केलं. धन्य ते सेनानी आणि धन्य धन्य ते महानायक छत्रपति शिवराय.
अखेरची 30मिनटे अक्षरशः खिळवून ठेवतात. जणू काय 12 वा रूद्र म्हणावा अश्या आवेशात लढणारे, डोळ्यांतून अक्षरशः आग ओकणारे, हजारो घाव आणि छातीत गोळी झेलून देखील प्राण कंठाशी नव्हे तर कानांशी साठवून लढणारे, तोफांचे पाच बार ऐकून मगच समाधानाने प्राण सोडणारे बाजीप्रभू अजय पुरकर यांनी तंतोतंत उभे केले आहेत. भूमिका जगणे म्हणजे काय याचा वस्तुपाठ म्हणावा अशी नॅशनल अवॉर्ड विनिंग भूमिका अजय पुरकरांनी साकारली आहे. गुरुत्वाकर्षणाच्या नियमांना नं जुमानणारे, अशक्यप्राय, पुष्पा स्टाईल ओव्हर द टॉप ॲक्शन सीन्स् दाखवण्याचा मोह इथे टाळला आहे.. त्यामुळे इथे दाखवलेली लढाई ही अकृत्रिम आणि त्यामुळे विषयाचा आब राखणारी झाली आहे. उण्यापुऱ्या चोवीस तासांचा हा रोमहर्षक थरार कोट्यवधी शिवप्रेमींना आयुष्यभर पुरेल अशी प्रखर स्वामिनिष्ठेची, शौर्याची, धैर्याची, बुलंद इच्छाशक्तीची, पराकाष्ठेच्या देशाभिमानाची आणि स्वाभिमानाची शिदोरी पुरवत आलेला आहे, आणि अद्यापही त्यातला शिधा जराही कमी झालेला नाही, कधी होणारही नाही... धन्याला दिलेल्या वचनाखातर मृत्यूलाही रोखून धारणारी ही अलौकिक, अद्वितीय शौर्यगाथा युगानुयुगे अशीच प्रेरणा देत राहील, स्वराज्याचे महत्व सांगत राहील आणि लढण्याची नवी उमेद देत राहिलं यात शंकाच नाही...
सरतेशेवटी 300 मावळ्यांच्या दैदिप्यमान शौर्यगाथेच्या पावनस्मृती मनात साठवून, जड अंतःकरणाने, परंतु प्रसंगोपात् आपणही परिस्थितीशी असेच दोन हात करू शकू असा आत्मविश्वास आणि प्रेरणा घेऊनच प्रेक्षक सिनेमागृहाच्या बाहेर पडतो. या सिनेमाचे हेच यश आहे... हर हर महादेव... जय शिवराय... 🙏🏻
*डॉ. अभिजीत देशपांडे*
अत्यंत प्रेरणादायी, मापक विश्लेषण. कुठल्याच गोष्टींचा अतिरेक नाही तर वस्तुतः मांडणी अप्रतिम ,अभिजीत लवकरात लवकर ह्या सिनेमाचा अनुभव घेईन, तुझ्या review नंतर न पाहणे शक्य नाही. हर हर महादेव..जय शिवराय.
ReplyDeleteThank you... नक्की बघा
Deleteअप्रतीम
DeleteThank you Amol...
ReplyDelete